परळी जवळील वसंतनगर तांडा येथे पूजा चव्हाण हिच्या नातेवाईकांची तृप्ती देसाई यांनी शनिवारी भेट घेतली. यानंतर बोलताना देसाई म्हणाल्या, पूजाच्या मृत्यूला दोन आठवडे पूर्ण झाली आहेत. या प्रकरणात राज्य शासनातील एका मंत्र्याचा सहभाग असल्याची चर्चा करण्यात येत आहे. मृत्यू संदर्भातील अनेक ऑडिओ व्हायरल झाले आहेत. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात झाल्याचेही समोर आले आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला पाहिजे; मात्र राज्य शासनातील प्रभावशाली मंत्री यात अडकल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक तपासासाठी सीबीआयकडे देत संबंधितांची नार्को चाचणी करावी, त्यातूनच सत्य बाहेर येईल, असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.
चौकट,
परळीतून आवाज उठवला पाहिजे
सत्ताधारी पक्ष आपल्या मंत्र्यांना आणि सत्ता वाचविण्यासाठी हे प्रकरण दाबत आहेत; मात्र मृत पूजाला न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढणार आहोत, असेही देसाई यांनी सांगितले. पूजाच्या आई -वडिलांवर कोणाचा दबाव आहे का? हे जाणून घेण्यासाठी इथंपर्यंत आले आहे. परळी शहरातूनही पूजाला न्याय मिळविण्यासाठी आवाज उठविला पाहिजे, असेही तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या. यावेळी भूमाता ब्रिगेडचे कार्याध्यक्ष कांतीलाल गवारे, लातूर येथील महिला कार्यकर्त्या स्वाती वट्टमवार, रेणुका मुळे व परळीच्या बंजारा समाजाच्या नेत्या शांता राठोड आदी उपस्थित होत्या.
फोटो कॅप्शन : परळीजवळील वसंतनगर तांडा येथे पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा करताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह इतर.
===Photopath===
200221\img20210220140021_14.jpg