परळी : सत्ताधारी पक्ष आपल्या मंत्र्यांना आणि सत्ता वाचविण्यासाठी हे प्रकरण दाबत आहे. या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढणार आहोत. यात ज्यांची नावे आली आहेत त्यांची नार्को टेस्ट करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भू माता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी केली. परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या भेटी दरम्यान शनिवारी दुपारी त्या बोलत होत्या.
पूजा चव्हाणच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. आज दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन त्यांचे सांत्वन करून विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, पालकांची तक्रार नसली तरी जे काही पुरावे पुढे येत आहेत त्यावरून पोलिसांनी कारवाई करावी. या प्रकरणात राज्यातील मंत्र्यांचे नाव येत आहे. यामुळे त्यांना आणि सत्तेला वाचविण्याचा प्रयत्न करत सरकार प्रकरण दाबत आहे. एखादा मंत्री गायब कसा काय व्होऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. संबंधित लोकांची नार्को टेस्ट करून सत्य बाहेर आणण्यासाठी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली.
कोण आहे पूजा चव्हाण?पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. ती अतिशय डॅशिंग होती. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.