लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयासह परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित व संशयितांना जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराची सध्या मनमानी सुरूच आहे. वेळेवर जेवण आणि नाश्ता मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अपुरे मनुष्यबळ आणि स्वयपांकासाठी महिला कामगार नाहीत, अशी कारणे हा कंत्राटदार देत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
काही लोकांनी तक्रार केल्यास केवळ एक- दोन दिवस वेळेवर जेवण जाते. परंतु नंतर याकडे दुर्लक्ष होते. बुधवारी दुपारचे जेवण १ वाजता जाण्याऐवजी २ वाजेपर्यंत पोहचलेच नव्हते. त्यामुळे कोरोना वॉर्डमधील रुग्ण भुकेने आसुसले होते. वेळेवर जेवण मिळत नसल्याने औषधी घेण्यासह उशीर होत आहे. अशा परिस्थितीत तो ठणठणीत कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तक्रार केल्यास वेळेवर जेवण, नंतर परिस्थिती जैसे थे
आयटीआय सेंटर...
शासकीय आयटीआय सेंटरमध्येही उशिरा जेवण दिले जाते. तसेच अनेकदा जेवण कमी दिले जात असल्याने घरून जेवण पाठवावे लागत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कंत्राटदारामुळे हाल
जिल्हा रुग्णालयात जेवण, नाश्ता पुरविणाऱ्या कंत्राटदाराची सध्या मनमानी सुरू आहे. उशिरा जेवण दिले जात असल्याने संशयित व कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत.
वेेळेवर, नियमित आणि दर्जेदार व चविष्ट जेवण देण्याबाबत वारंवार सूचना केल्या जातात. उशिरा जेवण जात असेल तर आता पाठीशी घातले जाणार नाही. चौकशी करू, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सांगितले.