लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय अद्यापतरी कागदावरच राहिलेला दिसून येत आहे. केवळ सर्व्हे करण्यातच संबंधित कंपनी वेळ घालवत आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच बीड बसस्थानकातील सुरक्षितता ऐरणीवर आली असून, चोरी, लूटमार, छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बीड बसस्थानकात रविवारी रात्री ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. हा अपघात की घातपात याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पोलिसांनी तपासासाठी रा.प.म.कडे सीसीटीव्हीची विचारणा केली. मात्र, स्थानकात सीसीटीव्ही नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या मृतदेहाबद्दल तपास लावण्यात यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या बॅग, पर्स व पाकीट मारण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणा-या मुलींची स्थानकात छेड काढली जात आहे. त्यामुळे महिला व मुलींमधून संताप व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर ठाण्यांतर्गत येथे तीन पोलीस कर्मचारी नेमलेले आहेत. हे तिघे आठ तासांचे कर्तव्य बजावतात. वास्तविक पाहता प्रवाशांची गर्दी व बसस्थानकाचा परिसर पाहता हा बंदोबस्त किरकोळ आहे. येथे किमान पाच ते सहा पोलीस कर्मचारी नेमून बसस्थानकात सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. वेळीच या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा इशारा मंत्री यांनी दिला.रा.प.म. बद्दल संतापस्थानकात आल्यानंतर चोरी, छेडछाड, लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अनेक प्रवासी स्थानकात येणे टाळू लागले आहेत. ज्यांना सुरक्षिततेबद्दल विश्वास नाही ते तर स्थानकाकडे फिरकतच नसल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे रा.प.म.ची प्रतिमा मलीन होत असल्याचे बोलले जात आहे. हे टाळण्यासाठी स्थानकात सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कंपनी येते, अन् सर्वेक्षण करून जातेबीड बसस्थानकात सीसीटीव्ही बसविण्यासाठी यापूर्वी दोनदा सर्वेक्षण करण्यात आले. जागा निश्चितीही झाली. मात्र, सीसीटीव्ही बसविले नाहीत. रा.प.म.च्या अधिकारी - कर्मचाºयांचा वेळ घेऊन त्यांना सर्वेक्षणाच्या नावाखाली अडकवले जात आहे. प्रत्यक्षात कॅमेरे बसविण्यात उदासीनता असल्याचा आरोप जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे.