बीड : मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी तालुक्यातील गावांमध्ये अचानक भेटी देत शाळा, ग्रामपंचायती आणि अंगणवाड्यांची पाहणी केली. स्वच्छता, शिस्त, गुणवत्ता, वक्तशीरपणाबाबत शिक्षकांना सूचना करताना काही ठिकाणी त्यांनी वर्ग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शनिवारी अनेक ठिकाणी शिक्षक शाळेवर नसतात, अशा तक्रारी अनेकदा ऐकायला मिळालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा दौरा केला. कुर्ला, लोळदगाव, शिदोड, आहेर निमगाव, माळापूरी, पेंडगाव येथील जि. प. शाळांना त्यांनी भेट दिली. वर्ग, शाळा परिसरातील स्वच्छता, सुविधांची पाहणी केली. काही शाळांचे शिक्षक बैठकीला तर काही पालक भेटीला गेल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी ग्रामसेवक हजर नव्हते. उपस्थित शिक्षकांना स्वच्छता, तंबाखूमुक्त, प्लास्टिक निर्मूलनाबाबत सूचना करताना मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कमी पडू नका, विद्यार्थी, ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपणाचे नियोजन करा असे आवाहनही केले. यावेळी जलबचत, घन कचरा व्यवस्थापन याबाबतही सूचना केल्या.शाळांमध्ये नवोदय, शिष्यवृत्ती, जिज्ञासा कसोटी परीक्षा किती मुलांनी दिली? याची विचारणा केली. सुटीत काय केले, वर्तमानपत्र वाचतात का? असेही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. एका उर्दू शाळेत पुस्तक संच मिळाले की नाही याची मुलांना प्रश्न विचारत खात्री केली. विद्यार्थ्यांची बौध्दिक चाचणी घेत सीईओंनी गणित आणि इंग्रजी व्याकरण शिकविले. सातवीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रज वाचन घेतले. टेन्सवर भर देण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, विस्तार अधिकारी तुकाराम पवार उपस्थित होते.सगळेच होणार अधिकारीएका शाळेत ‘मी कोण आहे? ’ असा प्रश्न केला तेव्हा वर्गातील मुलांपैकी कोणी सर तर कोणी साहेब, असे उत्तर दिले. त्यावर स्वत:चा परिचय देत जिल्हा परिषद माहित आहे का, मी तेथे असतो.माझ्यासारखे किती जणांना सीईओ व्हायचं? असा प्रश्न येडगे यांनी केला. सगळ्याच मुलांनी हात वर केले तेव्हा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल’ असे सांगत शिकविले.
सात गावांच्या भेटीत सीईओंनी घेतला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:08 AM
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी तालुक्यातील गावांमध्ये अचानक भेटी देत शाळा, ग्रामपंचायती आणि अंगणवाड्यांची पाहणी केली.
ठळक मुद्देशाळा, अंगणवाडीसह ग्रामपंचायतींची केली अचानक पाहणी