प्रशिक्षक अमोल राठोड म्हणाले, शाळेतील तंत्रज्ञानाचा अवलंब करून बीज प्रक्रिया करणे, पक्षी थांबे उभारणे, योग्यवेळी शेंडे खुडणे, पिवळे व निळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, ५ टक्के निंबोळी अर्क फवारणे अशा बाबींचा अवलंब करावा, त्यामुळे कमीत कमी खर्चात पीक हातात येते, असेही यावेळी राठोड म्हणाले. कृषी सहायक स्वामी, समूह सहायक महादेव कणसे, सरपंच शेषेराव गडदे, तुळशीराम कोपरेटकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी रक्तदान शिबीर
बीड : कोरोनाच्या भयंकर संकटात रक्तदाते घटल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी जी.के. सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीर सहयोग नगर गणपती मंदिर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तपिढीत रक्ताचा तुटवडा झाला. त्यातच कोरोनाच्या संकटात रक्तदाते घटले, यामुळे तुटवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरून काढण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपत जी.के. प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आवाहन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
शिवजन्मोत्सवानिमित्त चव्हाणवाडीत कार्यक्रम
बीड : गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान शिबीर, शिवव्याख्यान, मोटारसायकल रॅली काढून शिवरायांना अभिवादन, शोभायात्रा तसेच वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. १९ रोजी स.८ वा. शोभायात्रा निघणार आहे. दुपारी १२ वा. जि.प. शाळेत १ ली ते ८ वी वयोगटातील मुला-मुलींसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, रयतेचा राजा शिवछत्रपती, राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय असतील. यातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. दुपारी ४ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुचाकी रॅली काढून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल. २२ रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबीर होणार आाहे. सायं. ७ वा. शिवव्याख्याते खंडू डोयफोडे यांचे शिवव्याख्यान होईल. लाभ घेण्याचे आवाहन किशोर मुटके, विठ्ठल पिंपळे, गोकुळ शेळके, रावसाहेब चव्हाण यांच्यासह चव्हाणवाडीकरांनी केले आहे.