लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : सोलापूरकडून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक कठडा तोडून दीडशे ते दोनशे मीटर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. ही घटना धारूर-तेलगाव रस्त्यावरील धारूर घाटात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
धारूर-तेलगाव रस्त्यावर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून घाटातील रस्ता चकाचक झाला. मात्र रस्ता अरुंदच असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सोलापूरकडून सिमेंट भरून परभणीकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.-१२, एन.एक्स.४०९०) घाटातील एका अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत दोनशे मीटर खोल कोसळला. या अपघातात गाडीचा चालक पैगंबर पटेल हा जागीच ठार झाला. धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील तत्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचले. ट्रक चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. धारूर घाटात नेहमीच घडणाऱ्या अपघातामुळे वाहनधारकांत भीती निर्माण झाली आहे.
180921\1240-img-20210918-wa0051.jpg
धारूर घाटातील दरीत कोसळलेला सिमेंटचा ट्रक.