बीड : माजलगाव येथील उप विभागीय अधिकारी, शेतचारी अस्तरीकरण उप विभाग क्र १० मधील दप्तर कारकुनाने वैयक्तिक जलसिंचन विहीरी करिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शेतकऱ्याकडून तीन हजार रूपयांची लाच घेतली. या कारकुनाला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी दुपारी बेड्या ठोकल्या.
शेख वसीम शेख शाफिक (वय ३३) असे लाच घेणाऱ्या कारकुनाचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसिंचन विहिर मंजूर झाली होती. ज्या शेतात मंजूर झाली त्या शेताचे अन डिमांड प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदाराने उप विभागीय अधिकारी, शेतचारी अस्तरीकरण उप विभाग क्र १० यांच्याकडे अर्ज केला होता. ते देण्यासाठी या कार्यालयातील दप्तर कारकुन शेख वसीम याने ३ हजार ५०० रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३ हजार रूपचे घेण्याचे ठरले.
एसीबीने खात्री करून शुक्रवारी दुपारी त्याला माजलगाव शहरात लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक युनूस शेख, भरत गारदे, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे आदींनी केली.