बीड : मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूचा संसर्गामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेश कसे द्यायचे यावर काथ्याकूट सुरू आहे. या प्रवेशासाठी सीईटीचा विचार केला जात आहे. अकरावी, तंत्रनिकेतन, आयटीआय व तत्सम प्रवेशासाठी कोणते निकष लावायचे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतील की नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. बीड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. दुसऱ्या लाटेशी सामना करतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. मार्च २०२० पासून ते आतापर्यंतचा शैक्षणिक वर्षाचा कालवधीत कोरोनामुळे अस्थिर वातावरणात गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन तसेच कलचाचणी झालेली नाही. परिणामी क्षमता तपासता आलेली नाही. त्यामुळे सीईटी कशा पद्धतीने घेता येईल, यावर विचारमंथन सुरू असले तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र अकरावीच्या प्रवेशाबाबत संभ्रमच आहे.
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर तसेच त्यावरून विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये त्यांना प्रवेश मिळतो. अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआय प्रवेशासाठी निकषात बदल करावे लागतील का? याचा विचार गरजेचा आहे.
ऑनलाइन सीइटी झाली तर ग्रामीण भागाचे काय?
अकरावी प्रवेशासाठी सीईटी ऑनलाइन झाली तर या परीक्षेत सगळेच विद्यार्थी सहभागी होतील अशी स्थिती सध्या तरी नाही. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या उद्रेकजन्यस्थिती तसेच तांत्रिक अडचणी पाहता तेथील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतील की नाही? हाही प्रश्नच आहे.
ऑफलाइन सीईटी झाली तर कोरोनाचा धोका
कोरोनामुळे संकटजन्य स्थितीत ऑनलाइन सीईटी होण्याची शक्यता कमी मानली जाते. त्यात कोरोनाची तिसरी लाट भीती निर्माण करत आहे. धोका होण्याची शक्यता ऑफलाइन सीईटी अशक्य मानले जात आहे.
अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे?
दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ज्या शाखेत जायचे आहे तेथील प्रवेश मर्यादित आहेत. विद्यार्थ्यांची पात्रता, आवड आणि त्यांचा कल हे जाणून घेतला तर त्यांचे मूल्यमापन होईल यासाठी सीईटीसारखे परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
दोन, भाषा विज्ञान आणि गणित समाजशास्त्र या पाच विषयांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
------------------
अकरावी परीक्षेसाठी सीईटी घ्यायला पाहिजे. कला, विज्ञान, वाणिज्य किंवा इतर कोणत्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल समजेल. किमान ५० ते १० गुणांची ऑनलाइन सीईटी घ्यावी. एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठराविक कालावधी व वेळापत्रक ठरवून शाळांकडे त्याचे नियोजन दिल्यास हे शक्य आहे.
- प्रा. चंद्रकांत मुळे, जिल्हा चिटणीस, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, बीड.
--------------
दहावीचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने अकरावीसाठी सीईटी असायल्या हव्यात. त्याशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी समजणार? सीईटी झाल्यास मिळणाऱ्या निकालावरून पुढील मार्ग पालकांना निश्चित करता येईल. शैक्षणिक वाटचालीतील अपघात टळतील.
- प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य, बीड.
----
सर्वच दहावीचे विद्यार्थी व पालक हे कोविड परिस्थितीमुळे तणावग्रस्त असल्याने ११ वी, तसेच आयटीआय, तंत्रनिकेतनचे प्रवेश हे दहावीच्या गुणांच्या आधारे दिले जावेत, या प्रवेशाला सीईटी नको. मागील वर्षी बारावीच्या सीईटीला ३० टक्के विद्यार्थी कोविड परिस्थितीमुळे गैरहजर होते. हे विद्यार्थी तर दहावीचे आहेत आणि जर ते सीईटीला गैरहजर राहिले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
- प्रा. राहुल खडके, प्राचार्य, आदित्य पॉलिटेक्निक, बीड
------
अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा १५,६००
जिल्ह्यातील महाविद्यालये १७०
बीड शहरातील एकूण जागा २५००
------