बीड : दारूसाठी पैसे देण्यास नकार देताच एकाने गावातील व्यक्तीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. ही घटना पोळ्याच्या दिवशी आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथे घडली.
घाटा (पिंप्री) येथील दिगंबर गंगाराम घोडके (वय ४५) हे पोळ्याच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता घाटा (पिंप्री) फाट्यावरून घराकडे परतत होते. रस्त्यात गावातील संदीप माणिक झांजे हा भेटल्याने घोडके त्याच्या घरासमोर त्याला बोलत थांबले. संदीपने दारूसाठी पैसे देण्याची मागणी घोडके यांच्याकडे केली. घोडके यांनी नकार देताच संदीपने हातातील चाकूने त्यांच्या मानेवर वार केला. परंतु, घोडके यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविल्याने चाकू त्यांच्या डोळ्याशेजारी लागून गंभीर इजा झाली.
यावेळी रक्तबंबाळ अवस्थेतील घोडके यांच्या खिशातून संदीपने दोन हजार रुपये काढून घेतले. घोडके यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी आणि इतर ग्रामस्थ धावत तेथे आले. तोपर्यंत संदीपने तेथून पळ काढला. या हल्ल्यात घोडके यांना २५ टाके पडले असून सध्या त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिगंबर घोडके यांच्या तक्रारीवरून संदीप झांजे याच्यावर अंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.