माजलगाव ( बीड) – परळी येथे दोन दिवसापासून सूरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यासाठी आज सकाळी परभणी फाटा येथे तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तीन तास सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज केला असता संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलनादरम्यान एक खाजगी गाडी फोडण्यात आली तर, तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला.
सरकारी नौकरीत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय नौकरभरती करण्यात येऊ नये या मागणीसाठी दोन दिवसापासून परळी येथे मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन चालू आहे. या आंदोलना पाठींबा देण्यासाठी आज सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय महामार्ग २२२ आणि ५४८ (सी) या दोन्ही महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुरवातीला सुरळीत सुरु असलेले आंदोलन नंतर चिघळत गेले. आंदोलनादरम्यान वाहने घेऊन जाणाऱ्या गाड्यांना आंदोलनकर्त्यांनी लक्ष करून त्यांची तोडफोड करायला सुरुवात केली. यात एक खाजगी गाडी, मोटारसायकल फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज करायला सुरुवात केली असता आंदोलक अधिकच संतप्त झाले. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला होता. सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले आदींनी यांनी मध्यस्थी करून परस्थिती नियंत्रणात आणली.
आंदोलन चिघळण्याची चिन्हे असल्याने सहायक अधीक्षक भाग्यश्री नवटके तत्काळ घटनास्थळी आल्या. त्यांनी विनंती केल्याने आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळविला. तहसील कार्यालयाच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी आठ, दहा युवकांनी स्वतःचे मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला. शेवटी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात माजलगाव तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनास दलित, मुस्लीम, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सहभागी होत पाठींबा दिला.