लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिवसेना केवळ पक्ष नाही तर एक ज्वलंत विचार आहे. शिवसेनेइतके शिस्त इतर कोणत्याही पक्षात नाही. सध्या बीडमध्ये जिल्हा प्रमुखांच्या निवडीबद्दल चर्चा होत आहे, गैरसमज आहेत मात्र बदल हा सृष्टीचा नियम आहे. बीडमध्ये शिवसेनेची ताकत वाढवण्यासाठी बदल गरजेचा होता. हा बदल अचानक केलेला नाही, एक वर्षापासून बदलाची प्रक्र ीया सुरू होती असे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी शिवसेनेच्या बैठकित सांगितले.
बीड जिल्ह्यात शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी, सेनेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी नव्या दमाच्या सच्चा शिवसैनिकांवर जिल्हाप्रमुख पदाची जिम्मेदारी सोपवली आहे. नव्या जुन्या सर्व सैनिकांनी आणि पदाधिकाºयांनी मोठ्या मनाने हा बदल स्वीकारावा, असे आवाहन संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी केले. नवे जुने सर्वच पदाधिकारी चांगले असल्याचे सांगत बदलामुळे शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण असल्याचे माजी मंत्री बदामराव पंडित म्हणाले.
शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळूक, सहसंपर्क प्रमुख सुनिल धांडे, चंद्रकांत नवले यांच्या निवडीबद्दल शहरातील नवगण प्लाझा येथे व्यापक बैठक झाली. नूतन पदाधिकाºयांंचा सत्कार करण्यासाठी बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री बदामराव पंडित, सुनिल धांडे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, चंद्रकांत नवले, सभापती युध्दाजीत पंडीत, बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, बप्पासाहेब घुगे, सुदर्शन धांडे, बाळासाहेब जटाळ, बाबुराव जाधव, रोहीत पंडीत, नितीन धांडे, डावकर ताई, मुंडे ताई यांच्यासह सेनेचे तालुका प्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नवनिर्वाचित सरपंचांंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. प्रारंभी रॅली काढून संपर्क प्रमुख सुधीर मोरे व अन्य नेत्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.
यावेळी सुधीर मोरे म्हणाले, शिवसेना विचारावर चालणारा पक्ष आहे. अवघ्या एक ओळीचा आदेश निघतो व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक त्या आदेशाचे पालन करतात. नवे बदल करताना जुने लोक थोडे अस्वस्थ होणे साहजिक आहे.मोठ्या मनाने बदल आणि मातोश्रीच्या आदेशांचे पालन केले आहे. पाच पाच कोटी रूपयांच्या आॅफर धुडकावून लावल्या. बीड जिल्ह्यात शिवसेना नंबर एकचा पक्ष होता, मध्यंतरीच्या काळात काही चुका झाल्या. मात्र आता त्या चुका सुधारून शिवसेनेला पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील नंबर एकचा पक्ष बनवायचे आहे. १३ वर्षे जिल्हाप्रमुख पदावर ठेवल्यानंतर पक्ष पातळीवर काही बदल केले जात असतील तर ते स्वीकारायलाच हवेत असे ते म्हणाले.