माजलगाव (जि. बीड) : येथील परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेच्या ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झाल्याप्रकरणी चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे यांच्यासह २७ संचालक, कर्मचाऱ्यांवर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी, कर्मचारी फरार झाल्याचे सांगण्यात आले.
परिवर्तन मल्टीस्टेटच्या बीड, पुणे, पाथरी, परभणीसह ग्रामीण भागात जवळपास १८ शाखा आहेत. या सर्व जवळपास ३० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सहा महिन्यांपासून या ठेवी काढण्यासाठी गेलेल्या ठेवीदारांना तेथील अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने सर्वजण धास्तावले होते. आठ दिवसांपूर्वी संस्थेचे चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे अचानक फरार झाल्याने मल्टीस्टेटला टाळे लागले होते. यामुळे ठेवीदारांत एकच खळबळ उडाली. बुधवारी अनेक ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
यामुळे गुरुवारी बाळकृष्ण कोंडीराम तेरकर यांच्यासह शंभर ठेवीदारांच्या तक्रारीवरून परिवर्तनचे चेअरमन विजय उर्फ भारत मरिबा अलझेंडे यांच्यासह संचालक संजय बाबुलाल शर्मा, शेख फरीदा सुलताना शेख मजहर, सुशीला भारत अलझेंडे, अर्जुन मनोहर होके, विनोदकुमार रामविलास जाजू, बाबासाहेब सखाराम ढगे, अनमोल अलझेंडे, संदीप हिवाळे, किसन नागोराव मिसाळ, महेंद्र विठ्ठल टाकणखार, ज्योती शिवदास टाकणखार, सुरेखा शशिकांत खडके, उद्धव सीताराम जाधव, शुभांगी प्रकाश लोखंडे, शहाजी रामभाऊ शिंदे, अमिता किशोर प्रधान, धर्मराज दगडोबा भिसे, बळीराम भानुदास चव्हाण, जयराम गीरीजाआप्पा कांबळे, मालनबाई नारायण पवार, सुमित्राबाई नारायण गुंदेगर, त्रिंबक पांडुरंग गायगवे, अमित साठे, सुमित साठे, सदाशिव शेरकर, सतीष भिसे यांच्यावर गन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका फंड करीत आहेत.