बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ३४७१ शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. बदल्यांचे आदेश प्राप्त करण्यापासून कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी शिक्षकांमध्ये धांदल उडाली होती. दरम्यान बदली प्रक्रियेआधी आॅनलाईन माहिती भरणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी बदल्यांआधीच होणे गरजेचे होते असा सूर उमटत आहे.
बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यात १५९ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे सोपस्कर पार पडले. यातील लातूर जिल्ह्यातून आलेल्या ४२ पैकी २२ शिक्षकांना आदेश मिळाले. दरम्यान सोमवारी ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांना आदेश जारी केले. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत निर्देशित केले. तसेच संबंधित शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासूनच या आदेशाची शिक्षकांना प्रतीक्षा होती. आदेश प्राप्त होताच धांदल सुरु झाली.
दरम्यान पर्यायानुसार एकही शाळा उपलब्ध न झाल्याने ५७५ शिक्षक विस्थापित झाले. यात शिक्षक, मुख्याध्यापक, सहशिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना पुन्हा ३० मे रोजी आॅनलाईन अर्ज करावयाचे आहेत. त्यानंतर ३१ मे रोजी बदल्यांचे आदेश निघतील असे शिक्षण विभागात ऐकायला मिळाले. मंगळवारी बदल्यांबाबत निर्देश मिळाल्यानंतर आदेश प्राप्त करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये गर्दी पहायला मिळाली.