हकीकत अशी की, जेवण करून घरासमोर उभ्या असलेल्या पत्रकार जुनेद बागवान यांच्या लहान भावावर तिघांनी अचानक येऊन पाठीवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना ५ जुलै रोजी रात्री आठ वाजता रंगार चौकाजवळ घडली. दरम्यान हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जुनेद बागवान व त्यांच्या सोबत असलेल्या एका मित्रावर याच आरोपींनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता लोखंडी रॉडने हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. परवेज बागवान यांच्या फिर्यादीवरून ६ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
५ जुलै रोजी मन्यारवाडी रोड येथे हा पहिला प्रकार घडला. एका माहितीची शहानिशा करण्यासाठी जुनेद बागवान, शहानवाज शब्बीर बागवान असे दोघे जण त्या ठिकाणी गेले होते. त्याठिकाणी माउली आनंद बाप्ते, सागर ऊर्फ दत्ता आनंद बाप्ते, राम शिवाजी म्हेत्रे, बबलू रमेश सावंत, शुभम आनंद बाप्ते या पाच जणांनी जुनेद बागवान व शहनवाज बागवान यांना मारहाण केली होती. या हल्ल्यामध्ये शहानवाज बागवान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. दरम्यान, वरील घटनेत आरोपी असलेल्या तीन आरोपींनी त्याच दिवशी म्हणजे ५ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुनेदचा लहान भाऊ परवेझ जानमोहमंद बागवान (वय २० ) याच्यावर जीवघेणा हल्ला करून, त्याच्या पाठीवर वार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. ५ जुलै रोजी रात्री सात वाजता परवेझ हा स्वतःचे दुकान बंद करून घरी आला होता. जेवण करून तो घरासमोर थांबला असता, माउली बाप्ते, दत्ता बाप्ते, शुभम बाप्ते या तिघांनी अचानक येऊन त्याला बेदम मारहाण केली, तसेच पाठीवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. परवेझ याने आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत पडलेल्या परवेझ याने आरडाओरड केल्याने त्याची आई धावत घराबाहेर आली. त्यांनी व इतर नातेवाइकांनी परवेझ यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखम खोलवर असल्याने, त्याला बीडच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परवेझ जानमोहमंद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.