- नितीन कांबळे
कडा : सिना पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणारी बोट महसूल आणि पोलीस विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी जप्त केली. पंचनामा करत असताना सायंकाळच्या सुमारात अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांनी ती बोट पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तब्बल पाच तासाच्या शोधानंतर पथकाने पुन्हा बोट ताब्यात घेतली. ही घटना वाकी शिवारात घडली.
आष्टी तालुक्यातील वाकी शिवारात सिना पात्रातून बोटीच्या साहाय्याने वाळूचा अवैध उपसा होतो. याची माहिती मिळताच तहीलदार यांनी महसूल पथकास घेऊन गुरुवारी दुपारी थेट कारवाई करत वाळू उपसा करणारी बोट ताब्यात घेतली. यानंतर सायंकाळपर्यंत पंचनामा आणि ताबा पावतीचे काम सुरु असताना वाळू होता. यावेळी महसूल व पोलिस पथकाची नजर चुकवत चालकाने बोट पळवली. बोट पळवल्याचे लक्षात येताच पथकाने शोध मोहिम सुरु केली. यांनतर तब्बल पाच तासानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास बोट पुन्हा ताब्यात घेण्यास पथकाला यश आले. ही कारवाई तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, मंडलधिकारी इंद्रकांत शेंदुरकर, मंडलधिकारी पी.के.माडेकर, तलाठी प्रविण बोरूडे, तलाठी नवनाथ औंदकर, तलाठी जगदीश राऊत, कोतवाल फिरोज शेख, संतोष भुकन यांच्या पथकाने केली.