- नितीन कांबळेकडा- मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी दोन वर्षापासून सातारा पोलिसांना गुंगारा देत होता. या आरोपीस आष्टी पोलिसांनी पाच किलोमीटर पाठलाग करत मुसक्या आवळल्याची कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली. धर्मेद्र ननश्या काळे (३० रा.चिखली ) असे आरोपीचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील चिखली येथील धर्मेद्र ननश्या काळे याच्यावर दोन वर्षापूर्वी सातारा येथील वडूज पोलिस ठाणे हद्दीत संघटितपणे दरोडा, दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी २०२२ मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो स्थानिक पोलिसांना गुंगारा देत पळत होता. दरम्यान, आज आष्टी पोलिसांना धर्मेद्र काळे हा चिखली येथील घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून आष्टी पोलिसांनी त्याच्या घराकडे कूच केली. मात्र, पोलिसांना पाहताच त्याने धुम ठोकली. पोलिसांनी तब्बल पाच किलोमीटर पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. सायंकाळी सातारा येथील वडूज पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर,राजाभाऊ सजगणे, भरत गुजर,पोलीस शिपाई बब्रुवाण वाणी,अशोक तांबे,पोलीस हवालदार अशोक शिंदे,यांनी केली.