आष्टी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आष्टी शाखेच्या अध्यक्षपदी डाॅ. प्रतापसिंह चौरे यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष डाॅ. रामदास सानप, सचिव सुनील बोडखे, कोषाध्यक्ष डाॅ. सुजय सोनवणे यांचा समावेश आहे. शाखेचे १८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन झाले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ. रामकृृृृष्ण लोंढे, राज्य उपाध्यक्ष डाॅ. रवींद्र कुटे, राज्य सहसचिव डॉ. शिवाजीराव काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष डाॅ. रामकृृृृष्ण लोंढे म्हणाले, गेल्या महिन्यात भंडारा जिल्ह्यात सरकारी रुग्णालयातील बाल शिशूगृहात आग लागून चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला. या आगीत दोषींवर कारवाई करण्याचे सोडून शासनाने डाॅक्टरांना दोषी धरून, येथील डाॅक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. परंतु याठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनने एकजुटीने आवाज उठविल्याने डाॅक्टरांवरील कारवाई रोखली, हे एकीचे बळ आहे.
डाॅ. लोंढे पुढे म्हणाले, १९९२ मध्ये या इंडियन मेडिकल असोसिएशनचा सदस्य झालो. सुरुवातीला आमचे १२ सदस्य होते. आज याच कामाचे चीज झाले आणि तब्बल ३९ वर्षांनी मराठवाड्याला राज्याचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आष्टी येथे बीड जिल्ह्यातील सातवी शाखा आहे. संपूर्ण भारतात साडेतीन लाख सदस्य आहेत.
रवींद्र कुटे म्हणाले, महाराष्ट्रात ही आजची २१८ वी शाखा स्थापन झाली असून, महाराष्ट्रात ४५ हजारपेक्षा जास्त सभासद आहेत. शिवाजीराव काकडे म्हणाले, आयएमए ही भारतात सर्वात मोठी संघटना असून, देशात आतापर्यंत ३२ राज्यात साडेसतरा हजार शाखा असून ही सर्वात जुनी संघटना आहे. यावेळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात डाॅ. अशोक गांधी, डाॅ. मधुकर हंबर्डे, डाॅ. कल्याण वारे, डाॅ. डी. एस. काकडे, डाॅ. विलास सोनवणे यांचा जीवन गौरव म्हणून सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले. डाॅ. विलास सोनावणे यांनी आभार मानले.
आष्टी येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष रविंद्र कुटे, सहसचिव डॉ. शिवाजीराव काकडे व नूतन पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
200221\img_20210218_191119_14.jpg