लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून शुभकल्याण मल्टीस्टेटने आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ४२० ठेवीदारांना गंडा घातला आहे. १० ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. याचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. या शाखेकडून तपासात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप ठेवीदारांकडून केला जात आहे. त्यामुळे ही गुन्हे शाखाही संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून, येथील अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय बळावला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वरपगाव येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे. दिलीप आपेट हे त्याचे अध्यक्ष. जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून मोठी गुंतवणूक करुन घेतली. त्यानंतर अध्यक्षांसह संचालक मंडळाने धूम ठोकली. ठेवीदारांनी संबंधित शाखांकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शेवटी संतप्त ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून अध्यक्षासह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. आतापर्यंत बीडसह अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दिलीप आपेटसह भास्कर शिंदे, अजय आपेट, नागिनी शिंदे, विजय आपेट, कमलाबाई नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा आंधळे, आशा बिरादार, बाबूराव सोनकांबळे या संचालकांसह शाखाधिकारी व इतर कर्मचाºयांचा आरोपींत समावेश आहे.दरम्यान करोडो रुपयांना गंडा घातल्यानंतर ठेवीदार रोज आर्थिक गुन्हे शाखेत येऊन तपासाबद्दल विचारणा करीत आहेत. मात्र, येथील अधिकारी तपास सुरु आहे असे सांगत चालढकल करीत आहेत. ठेवीदारांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेबद्दल संताप व्यक्त करण्याबरोबरच तपासाबद्दल संशय व्यक्त होत आहे.१० पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे : आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासात दिरंगाईआतापर्यंत १० गुन्हे दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून ठोस तपास झाला नसल्याचे दिसून येत आहे. माध्यमांनी विचारल्यानंतर येथील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. तपास सुरु आहे असे सांगून वेळ मारुन नेत आहेत. लवकर तपास लावून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी होत आहे.
शुभकल्याण मल्टीस्टेटकडून बीड जिल्ह्यातील ठेवीदारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:04 AM