केज : तुमच्या घरातील करणी-भानामती व गुप्तधन काढून देतो, असे म्हणत स्वाती दत्ता खाडे नामक पस्तीस वर्षीय महिलेची सहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी (दि. १२) धारूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती, पती व तीन मुलींचे हे कुटुंब आहे. वर्षभरापूर्वी वैजेनाथ मेहत्रे (महाराज) त्यांच्या घरी आला. त्यावेळी तुमच्या घरात गुप्तधन आहे. ते मी काढून देतो. मात्र त्यापूर्वी तुमच्यावर केलेली करणी-भानामती काढावी लागते. तीदेखील मी काढतो असे सांगून वैजेनाथने दत्ता खाडे यांना विश्वासात घेत त्यांच्याकडून २६ जानेवारी रोजी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी गणेश कोराळे (रा. मानेवाडी) यांच्यासमक्ष एक लाख रुपये, २५ फेब्रुवारी रोजी संतोष मेहत्रे यांच्या समक्ष दोन लाख रुपये दिले. त्यानंतर १४ मार्च रोजी वैजेनाथ मेहत्रे पुन्हा खाडे यांच्या घरी आला व ठरलेले पैसे दिल्याशिवाय मी गुप्तधन काढून देणार नाही, असे त्याने सांगितले. त्यावेळी खाडे पती-पत्नीने आतापर्यंत साडेतीन लाख रुपये दिल्याचे मेहत्रेला सांगितले. त्यावर मेहत्रे याने अगोदर राहिलेले पैसे देण्याची मागणी केली. त्यामुळे खाडे यांनी महालिंग प्रभूआप्पा आकुसकर यांच्यासमक्ष मेहत्रेला अडीच लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे एकूण सहा लाख रुपये वैजेनाथ मेहत्रेने उकळले होते. त्यानंतर आता तरी आमच्या राहत्या घरातील गुप्तधन काढून करणी-भानामती दुरुस्त करण्याची विनंती केली. त्यावर वैजेनाथ तुमच्यावर खूप मोठे संकट आहे, ते अगोदर दूर करू, असे सांगून टाळाटाळ करीत राहिला. त्यामुळे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले.
या प्रकरणी वैजेनाथ मेहत्रे याच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अडागळे हे करीत आहेत.
फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही गेलो असता पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत ठाण्यातच बसणार असल्याचा पवित्रा घेतल्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करून अटक न केल्यास वरिष्ठांकडे न्याय मागणार आहे.
- स्वाती खाडे
(फसवणूक झालेली महिला)