माजलगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याने लोकांना स्वराज्याबद्दल आपुलकी होती. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी जलव्यवस्थापन व पर्यावरणाविषयी विशेष लक्ष दिले, असे प्रतिपादन आ. प्रकाश सोळंके यांनी केले.
येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, डॉ. एन. के.मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. सोळंके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष व्यवस्था निर्माण करून गुणवत्ता आणि निष्ठा असणारे मावळे निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयात सामान्य ज्ञान व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धेत हरी गायकवाड, गणेश तौर, बाळासाहेब पुजारी व रांगोळी स्पर्धेत गायत्री चाळक,अमृता विभुते,ज्ञानेश्वरी फपाळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. प्रा. बालाजी बोडके यांनी आभार मानले.