Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. बीड जिल्ह्यात एका तरुणाने आरक्षण दिले जात नसल्याने आत्महत्या केली. या तरुणाच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करतानाच मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आत्महत्या करू नका -मनोज जरांगे
सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. सरकार शब्द पाळत नाही, अशी चिठ्ठी लिहून अर्जून कवठेकर या तरुणाने गळफास आत्महत्या केली. या घटनेबद्दल कळल्यानंतर मनोज जरांगे यांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
अर्जून कवठेकर या तरुणाने बीड जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले. मनोज जरांगे घरी आल्यानंतर कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. जरांगेंनी कुटुंबीयाचे सांत्वन केले. कोणीही आत्महत्या करू नका. मी आरक्षण देण्यास समर्थ आहे, असे आवाहन जरांगे यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केले.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांवर टीका
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "अर्जून कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जबाबदार आहेत. आता मी यांना सोडणार नाही. आरक्षण कसे देत नाहीत, मी पाहतो. पण, तरुणांनी आत्महत्या करू नये, कुटुंब उघड्यावर आणू नये", असे मनोज जरांगे म्हणाले.