लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसादेखील वीजपुरवठा करुन देणा-या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी घेतला आहे. तसेच मोठ्या संख्येने योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.ज्या शेतक-यांकडे जलस्त्रोत आहे, मात्र पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नाही त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या माध्यमातून पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्ह्यातील २१७० शेतक-यांनी अर्ज केले असून, १३० जणांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. त्यामुळे शेतकºयांना २४ तास वीज उपलब्ध होऊन पिकांना पाणी देणे सोपे होईल. ५ एकर क्षेत्राच्या आतील शेतक-यांना ३ एचपी डीसी व ५ एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणा-या शेतक-यांना ५ एचपी डीसी सौर पंप दिला जाणार आहे. यासाठी ७/१२ वर विहीर किंवा बोअरची नोंद असणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे या योजनेची प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे अर्ज केल्यानंतर योजनेस पात्र ठरल्यावर तात्काळ मोबाईलवर मेसेज येतो. त्यामुळे कार्यालयात जाण्याची देखील आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया सात्रा येथील शेतकरी पोपट हावळे यांनी दिली.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा २१७० शेतकऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:54 AM