बीड : कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेसह विविध क्षेत्रात बीडच्या आरोग्य विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल बीडच्या आरोग्य विभागाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांना यापुढेही ही लय कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी त्यांनी १०० खाटांच्या माता व बाल रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपुजन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १०० खाटांच्या माता व बाल रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपुजन थाटात करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.सुरेश धस, आ.आर.टी. देशमुख, आ.विक्रम काळे, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, आरोग्य ेउपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अपवादात्मक घटना वगळता जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कामात सुधारणा झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया, मोतिबिंदुमुक्त महाराष्ट्र यामध्ये बीडचे काम राज्यात अव्वल आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांचा दिल्लीत गौरवही झाला होता. हीच माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ.धस यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डॉ.थोरात यांना बोलावून घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ.पवार यांचीही उपस्थिती होती. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.राजेश शिंदे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०० खाटांसाठी निधी देणार१०० खाटांच्या रूग्णालयाला निधी मिळाला असला तरी २०० खाटांच्या रूग्णालय इमारतीसाठी अद्यापही निधी मंजूर झालेला नाही. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित करून ही बाब समोर आणली होती. याचीच दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावून तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.