बीड : तालुक्यातील जरूड गावात देवाचा पारंपरिक रथ ओढताना १४ वर्षीय मुलाचा रथाच्या चाकाखाली चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी भैरवनाथ मंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षासह सदस्यांविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात तपासाअंती गुन्हा दाखल झाला आहे. बालासाहेब बळीराम काकडे, कांता बाबूराव काकडे, संजय बळीराम काकडे व इतर सदस्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
बीडपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जरूड गावात जागृत देवस्थान असणाऱ्या भैरवनाथाची यात्रा भरते. दोन वर्षे कोरोनामुळे ही यात्रा भरली नव्हती; परंतु यावर्षी भरल्याने भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी परंपरेप्रमाणे यावर्षीही भैरवनाथाचा रथ ओढण्यात आला. भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्यांनी हयगयीने व निष्काळजीपणा करून मंदिराच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमले नव्हते. त्यामुळे यात्रेत रथामधील देवावर फेकलेल्या रेवड्या वेचत असताना रथाचे चाक डोके व अंगावरून गेल्याने परमेश्वर नागेश बर्डे हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. याप्रकरणी नागेश बापू बर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक ढाकणे करीत आहेत.