बीड : मुले पळविणारी टोळी समजून ट्रक क्लिनर व एका भोळसर व्यक्तीला जमावाने घेरले. मारहाणीच्या तयारीत असतानाच काही सुजाण नागरिकांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोघांना ताब्यात घेतले. ही घटना बीड तालुक्यातील पेंडगाव येथे रविवारी रात्री १२ वाजता घडली.
याच कारणातून धुळे जिल्ह्यात पाच जणांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच बीड तालुक्यातील पेंडगाव येथे मुले पळविणारी टोळी आल्याचे समजून मुकुंद मुरलीधर दूषी (४५, रा. करीमपुरा, बीड) या भोळसर व्यक्तीला काही नागरिकांनी घेरले. त्यांचा अवतार पाहून हा व्यक्ती मुले पळविणारा असावा अशा संशयातून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला जात होता. हाणा, मारा, पकडा असे म्हणत काही लोकांनी त्यांचा पाठलागही केला.
याच दरम्यान ट्रक चालकासोबत वाद झाल्याने अशोक मोहन माथाडी (रा. मध्यप्रदेश) हा क्लिनर रस्त्याने चालत बीडकडे येत होता. तो हिंदी भाषेतून बोलत होता. नागरिकांनी त्यालाही संशयाच्या घेऱ्यात घेत मारहाणीचा प्रयत्न केला. मात्र, येथीलच काही सुजाण नागरिकांनी ही माहिती बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिली. त्यांनी सहायक फौजदार व्ही. ए. गायकवाड, अमोल येळे, भागवत शेलार, रमेश दुबाले, रशीद खान, बी. डी. सोनवणे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. जमावाकडून मारहाण होण्यापूर्वीच त्यांनी या दोघांची सुटका करुन ग्रामीण ठाण्यात आणले. दोघांचीही चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला.