- मधुकर सिरसटकेज (बीड) : पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार एकाने धारूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तपासा दरम्यान विवाहिता अल्पवयीन असून बालविवाह झाल्याचे निष्पन्न झाल्याने पतीसह मुलीचे आई-वडील,मामा-मामी, सासू-सासरे अशा 10 जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकाने 19 जानेवारी रोजी धारूर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. धारूरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तपासाचे चक्र गतिमानकरून विवाहीतेस 27 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री (ता. राहता) येथून ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिस चौकशीत विवाहिता अल्पवयीन असल्याचे पुढे आले. 20 नोव्हेंबर 2021 रोजी मामाने जानेगाव येथे धारूर येथील मुलासोबत अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शालेय अभिलेख तपासून जन्मतारखे बद्दल खात्री केली. मुलीची जन्म तारीख 24 एप्रिल 2008 असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बालविवाह झाल्याचे उघडकीस आले.
धारूर पोलीस ठाण्याच्या जमादार दीक्षा चक्रे यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात 28 जानेवारी रोजी १० नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपित अल्पवयीन विवाहितेचा पती, सासू-सासरे, आई-वडील, मामा- मामी अशा दहा जणांविरुध्द बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 चे कलम 10 आणि 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.