माजलगाव : तालुक्यातील सादोळा येथे शुक्रवारी सकाळी १२ वाजता अल्पवयीन मुला-मुलीचा होणारा विवाह पोलिसांना वेळीच थांबवला आहे. यानंतर पोलिसांकडून विवाहस्थळी ठाण मांडून त्यांच्या जन्माच्या पुराव्याची शहानिशा केली जात आहे.
माजलगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतर असलेल्या सादोळा या ठिकाणी सत्यप्रेम सिताराम राऊत रा. सादोळा यांच्या मुलाचे विवाह घनसावंगी तालुक्यातील लिंबा येथील अशोक बेरे यांच्या मुलीशी दुपारी साडेबारा वाजता होणार होता. सकाळी आठ वाजता याठिकाणी वऱ्हाड देखील आले होते. हा विवाह अल्पवयीन मुला-मुलीचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस विवाहस्थळी दाखल झाले. वधू आणि वराच्या जन्मतारखेचा पुरावा दाखवल्या खेरीज विवाह होणार नसल्याचे सांगितले. याबाबतची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांना देण्यात आली असून पोलीस विवाह मंडपात तळ ठोकून आहेत.