बीड - तालुक्यातील बक्करवाडीत गर्भपातादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शीतल गाडे यांच्या मुलींची भेट घेण्यासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा व सदस्य २७ ऑगस्ट रोजी गावात पोहोचल्या; पण भीतीपोटी मुलींना घेऊन आजी शेतात जाऊन बसली. त्यामुळे संवाद न करताच आयोगाला परतावे लागले. दरम्यान, पाली येथे एचआयव्ही निगेटिव्ह चिमुकल्यास पूर्व प्राथमिक खासगी शाळेने शिक्षणास मज्जाव केल्याचा प्रकार घडला होता. या मुलाची आयोगाने भेट घेतली. भीक मागताना आढळलेल्या सहा आदिवासी मुलांचा शासकीय बालगृहात छळ झाला होता, या मुलांना पुन्हा बालगृहात आणून शिक्षण हक्क मिळवून देण्यात येणार आहे. राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, सदस्य चेतन पुरंदरे, ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी शनिवारी बक्करवाडी, पाली येथे भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना शहा म्हणाल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ज्या काही घटना बीडमध्ये समोर येत आहेत, त्या लाजिरवाण्या आहेत. आई-वडील एचआयव्ही बाधित व मुलगा निगेटिव्ह असतानाही त्यास शिक्षणापासून वंचित ठेवले जात असेल तर मानसिकता बदलण्याची गरज आहे. पालीतील मुलाला जवळ घेऊन संवाद साधला, त्याने मला शिकायचंय, अशी भावना व्यक्त केली, असे त्यांनी यावेळी नमूद केले.समाजाने या मुलांना वेगळी वागणूक देण्याऐवजी सामंजस्याने तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
बालहक्क आयोग दारात, भीतीपोटी कुटुंब शेतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:18 AM