बहुतांश पालक म्हणतात, शाळेत पाठवणार, काही म्हणतात, वर्ष तर वाया गेलेच आहे
बीड : आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची ओढ लागली असलीतरी बहुतांश मुलांना शाळा नको, घरीच मज्जा करावी वाटत आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याची जाणीव असलीतरी पालक मात्र संभ्रमातच आहेत. जिल्ह्यात शासन निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. या सर्व वर्गांमध्ये सध्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते.
कोविड आपत्तीमुळे ११ महिन्यांपासून पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत. या वर्गाच्या शिक्षकांना उपस्थित राहण्याचा दंडक असलातरी अध्यापन बंदच आहे. तर काही शाळांमधून विद्यार्थ्यांना मोबाइल तसेच ऑनलाइनद्वारे अभ्यास दिला जात आहे. मात्र तो प्रभावी ठरलेला नाही. घरातच माबाई, टिव्हीमध्ये मुले गुंतली आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे कॉलनी, बिल्डींग परिसरात खेळण्यास जायला मर्यादा आल्याने मुले कंटाळली आहेत. त्यामुळे बहुतांश मुले शाळेत जाण्यास उत्सुक असून शाळा कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे मुले शाळा आणि वर्ग विसरले आहेत. घराच्या परिसरातच सायकल व इतर खेळ खेळत आनंदात रमली आहेत. या मुलांना शाळेत जायला नको वाटते. जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी असलेतरी अन्य जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण चिंता निर्माण करत आहे. शाळेने खबरदारी घेतली तर कोरोनाची भीती राहणार नाही आणि मुलांचे शिक्षणही होईल, मोबाइलमध्ये ऑनलाइन कमी आणि मनोरंजनातच जास्त वेळ घालवतात,असे पालक घनश्याम पतंगे म्हणाले. मुलांना मोकळं वाटावं, शिकायला मिळावं म्हणून शाळेत पाठविण्याची पालकांची मानसिकता असलीतरी कोरोनाची लस मुलांंपर्यंत दिल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असा सूर व्यक्त होत आहेत.
----------
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
कोरोनामुळे शाळा बंद आहे. मोबाइल , टीव्ही पाहतो, सायकल आणि पतंग खेळतो. घरीच चांगले वाटते. शाळा नकोच. पण आई- बाबा म्हणतील तर शाळेत जाईन. - युवराज विणकर, इयत्ता तिसरी.
----------
बालवाडीतून मी पहिलीत गेलो. पण आमची शाळा सुरू झालेली नाही. शाळा सुरू झाली तर नवे दाेस्त भेटतील. सध्या मोबाइल खेळतो, टीव्ही पाहतो. -- राज भुतडा, इयत्ता पहिली.
-------
शाळेत जायला आवडते पण बंद आहेत. मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास करते. फावल्या वेळेत आईला मदत करते. शाळा सुरू झाली तर जाणार आहे. - अक्षदा पतंगे, इयत्ता चौथी.
--------
मी दुसरीला आणि भय्या तिसरीला आहे. शाळा बंद आहेत पर रोज ४ ते ६ ट्यूशनला जातो. शाळा कधी सुरू होणार आहेत, मला शाळेत जायचं आहे. -- श्लोक म्हेत्रे, इयत्ता दुसरी.
------
पालकांच्या प्रतिक्रिया
वर्ष वाया गेलेच आहे. पहिली ते चौथीच्या मुलांचे वय पाहता सद्यस्थितीत गॅप राहिलेला परवडतो. कारण ते मास्क घालणार नाहीत. काळजी घेणार नाहीत. त्यांना समज नसते. - शैलेश म्हेत्रे, पालक बीड.
------
मुलीने शाळेत जावे, असे वाटते. घरी किती अभ्यास होणार? नुकसान होत आहे. ऑनलाइन थोडाफार अभ्यास होतो. शाळा सुरू झाली तर मुले अभ्यासात गुंतून जातील- - स्नेहा प्रकाश जाधव, पालक
--------
शाळा सुरू व्हायला पाहिजे. किती दिवस घरी बसवणार? मुलांना शाळा नको तेवढी बरी वाटते. पालक बाजारात व इतरत्र फिरतात. सर्व काही चालू आहे, मग शाळा का नको? - धर्मा हातागळे, पालक
-------------
शाळा नसल्याने मुलांना मज्जा वायते. खेळायला मिळते. मुले घरी काहीच करीत नाहीत, ऐकतच नाही, शिकवलेले विसरून गेले. शाळा सुरू व्हायला पाहिजेत. - प्रियंका ओमप्रकाश भुतडा, पालक.
---------