बीड : जिल्ह्यात कोविडमुळे मातृ-पितृ छत्र हरवलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तहसील पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले. कोविडमुळे आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी, जि. प. चे बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रामेश्वर मुंडे, बालकल्याण समितीचे सुनील बळवंते, तत्त्वशील कांबळे, बालकामगार प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी, बालसंरक्षण अधिकारी एस. एस. निर्मळ, चाईल्डलाईनचे समन्वयक रामहरी जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी एन. एम. ताजनपुरे, बाजीराव ढाकणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा विधी सेवा समिती सदस्य सचिवांचे प्रतिनिधी, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
या बैठकीत कृती दलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. बालसंरक्षण अधिकारी एस. एस. निर्मळ यांनी आतापर्यंत जिल्हाभरातून संकलित माहितीआधारे कोविड -१९ साथरोगामुळे एकपालक, द्विपालक, विधवा झालेल्या महिलांबाबतची आकडेवारी सादर केली.
------------------
बीड जिल्हा सद्यस्थिती
मयत झालेल्या पालकांची संख्या - ३४८
आई गमावलेल्या बालकांची संख्या -२७
वडील गमावलेल्या बालकांची संख्या -३१४
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या- ७
विधवा महिलांची संख्या - ३१४
--------------
बालपणीच हरवले छत्र
जिल्ह्यात आतापर्यंत संकलित माहितीनुसार ० ते ६ वयोगटातील ७१ बालके, ६ ते १० वयोगटातील ९७ बालके, ११ ते १४ वयोगटातील ९८ बालके, १५ ते १८ वयोगटातील ८२ बालकांचे छत्र हरवलेले आहे.
------------
एकूण १९३ मुले आणि १५५ मुलींच्या नशिबी हे दु:ख आले आहे. यातील २७ बालकांची आई तर ३१४ बालकांचे वडील आणि ७ बालकांचे आईवडील कोरोनाने हिरावले आहेत.
------