१०७ जणांचे रक्तदान
परळी : येथील अभिनव विद्यालयात विधान परिषद सदस्य आमदार संजय दौंड यांच्या उपस्थितीत शिबिरात १०७ दात्यांनी रक्तदान केले तसेच गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव साहेबराव फड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर बाळासाहेब देशमुख, चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सुरेश टाक, माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाण, संजय फड, नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. अंकुश जब्दे, पोलीस निरीक्षक चाटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सविता जंगले यांनी केले.
नगराध्यक्ष, उपाध्यक्षांच्या वादात पुलाचे काम रखडले
माजलगाव : शहरातील प्रभाग - १ मध्ये असलेल्या संभाजीनगर येथे मागील एक वर्षापासून पूल तुटल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले असताना केवळ नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या वादात हे काम रखडले असल्याने आता या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या भागातील नागरिक नगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर कर भरत असताना या भागाचा विकास मात्र शून्य आहे. या भागात रस्ते, नाल्या, स्ट्रीटलाईट व नळ योजना झालेली नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात असलेल्या नाल्या न झाल्याने जागोजागी घाण पाणी व घाणीचे साम्राज्य पसरले असताना याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे.