दोन्ही किडनी निकामी झालेल्या शिलाबाई ला कोण देणार आधार!!
संतोष स्वामी/
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शीलाबाई कारभारी कोमटवार (वय ५०) या महिलेच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून, त्या जीवनाच्या अंतिम घटका मोजत आहेत. तिच्या जगण्यासाठी तिच्या मुलांची धडपड चालू आहे. परंतु गरिबीचा डाग लागलेल्या कोमटवार कुटुंबाला आधार कोण देणार? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
शीलाबाई कारभारी कोमटवार या मंगल कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचं काम करतात. गेल्या सहा महिन्यांपूर्वी अंगावर आलेल्या सुजेचं कारण घेऊन दवाखान्यामध्ये दाखल झाल्या. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचा अहवाल रुग्णालयातून मिळाला. काम केले तर पोट भरेल अशी परिस्थिती असलेल्या कोमटवार परिवारावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. शीलाबाई यांच्या गणेश व रवी या दोन्ही मुलांनी आतापर्यंत शीलाबाईंच्या आजारावर आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च केला आहे. आईला जगविण्यासाठी विविध बँकांचे लाखोंचे कर्ज या मुलांनी उचलले आहे. कोमटवार परिवाराला आता जगण्याची भ्रांत आहे. त्यातच एक दिवसाआड शीलाबाई यांना डायलिसिसचा उपचार करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. केवळ पैसे नसल्याने आठवड्यातून एक वेळ त्यांना डायलिसिस मिळत आहे. महात्मा जोतिबा फुले व आयुष्यमान भारत योजनेततून बराच खर्च वाचला आहे. तरीदेखील आजघडीला शीलाबाईच्या उपचारासाठी मुलांना पैशाची अतिशय निकड आहे. यासाठी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन कोमटवार कुटुंबीयांनी केले आहे.
.....
दिंद्रुडकरांनी राबविली मोहीम
शीलाबाई कोमटवार यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ९११९४११८४८ या रवी कोमटवार यांच्या मोबाइल क्रमांकावर फोन-पेद्वारे पैसे पाठविण्याचे आवाहन केले आहे. पन्नास रुपयांपासून स्वखुशीने जी रक्कम पाठविण्यात येईल ती कोमटवार परिवारासाठी आर्थिक मदत असणार आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
180921\img_20210918_133127.jpg
शिलाबाई कोमटवार