कडा : आष्टी तालुक्यात महसूल प्रशासन व पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोस, रात्री-अपरात्री विनापरवाना नदीपात्रातून मशीनच्या माध्यमातून वाळूमाफियाकडून मोठ्या प्रमाणावर उपसा होतो. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पडल्याने एका नऊवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी खिळद येथे घडली. प्रियंका मच्छिंद गर्जे असे त्या मुलीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील खिळद येथील डाग वस्तीवर राहणारे मच्छिंद गर्जे यांच्या वस्तीपासून जवळच असलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करण्यात आला आहे. येथे ना पोलिसांनी आडवले ना महसूलने, त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर पाणीदेखील भरले आहे. सोमवारी प्रियंका ही शेळ्या चारण्यासाठी अन्य मुलींसोबत गेली होती. ऊन लागल्याने हात-पाय धुण्यासाठी गेली असता
अचानक तिचा तोल गेल्याने व पाणी खोल असल्याने काहीच करता आले नाही. गटकळ्या खात खात तिचा बुडून मुत्यू झाला. महसूल व पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे तालुक्यात एक निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी वाढदिवस, सोमवारी अंत्यविधी
प्रियंका हिचा वाढदिवस रविवारी होता. घरचे व शेजारी आणि वर्गमैत्रिणींनी मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा करून औक्षण केले. पण काळाचा घाला किती वाईट असतो हे या घटनेतून पाहायला मिळाले. रविवारी वाढदिवस आणि सोमवारी अंत्यविधी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
===Photopath===
180321\nitin kmble_img-20210317-wa0026_14.jpg