चिंचोली माळी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंचोली माळी व परिसरात पावसाने हाहाकार माजवला आहे. काढणीला आलेले व काढून टाकलेल्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी वाहत आहे.
काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले होते; पण दुपारपासून पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, तसेच पावसात भिजत राहिले. अनेकांच्या सोयाबीनच्या गंजी पाण्यामध्ये पोहत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे पांढरे सोनेसुद्धा पावसात ओले झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. कापसामधून गुडघाभर पाणी वाहत आहे. त्यामुळे कापूस पिवळे पडण्याची पडण्याची शक्यता आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. काही शेतकऱ्यांनी गेल्या वेळेस विमा भरला होता; पण नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे या वेळेस काही शेतकऱ्यांनी विमा भरला नाही. तरी शासनाने सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.