नितीन कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पूर्वीच्या काळी माळवदाचे घर, मोठमोठे दगडी चिरेबंदी वाडे गावोगाव असायचे, पण आता आधुनिक काळात सिमेंट, विटाच्या जमान्यात खेड्यापाड्यांपासून ते शहरापर्यंत अनेक मजली घरे होऊ लागली आहेत. काळाच्या ओघात पूर्वी दिसणाऱ्या वाड्याची पडझड होऊन ती नामशेष होऊ लागली असल्याचे चित्र आहे.
आष्टी तालुक्यात पूर्वीच्या काळी सर्वसामान्य लोकांकडे मातीच्या भेंड्याची व देशमुख, कुलकर्णी, जोशी, पाटील, गुरुजी यांच्याकडे घडीव दगडाचे चिरेबंदी वाडे असायचे. या वाड्यात अनेक खोल्या आतल्या आत असायच्या आणि घरात गारवा कायम टिकवून राहायचा. या वाड्याचा रूबाब वेगळाच असायचा, पण जसजसे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होऊ लागले तसे दगडाची बांधकामे लोप पावत चालली. त्या जागी सिमेंट, विटांनी मोठमोठ्या इमारती, घरे उभारू लागली. गावखेड्यांकडील चिरेबंदी वाडे कालबाह्य होऊ लागली. घाटापिंपरी, देवळाली, दादेगांव, देविनिमगांव, देऊळगाव घाट, वाहिरा, धामणगांव, खिळद, पाटण, सांगवी, केरूळ, किन्ही, कडा, डोंगरगणसह अनेक गावात एकेकाळी दिमाखदार दिसणारे, घडीव दगडांनी बांधलेल्या वाड्यांची पडझड झाल्याचे पहायला मिळत आहे. पण काळ बदलला तसे लोक आणि आवडही बदलल्याने आता दगडी बांधकाम करणारे लोक बोटावर मोजता येतील एवढे राहिले.
पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब असायचे. त्यातून सामाजिक सलोखा व कुटुंबप्रमुखाचा धाक आणि दरारा राहायचा. गावातील एकमेकांच्या मदतीतून वाडे उभा राहायचे, पण आता एकत्रित कुटुंब पद्धत मोडकळीस आली. गाव सोडून लोक शेतात स्थलांतर झाल्याने हे वाडे आता नामशेष होऊ लागल्याचे प्रा. अंकुश तळेकर यांनी सांगितले.
...
अनेक चौकटी उभा राहिल्या
पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने एकाच वाड्यात अख्ख कुटुंब राहायचं, पण आता एकाच कुटुंबातील सदस्य विखुरले गेल्याने एका चौकटीऐवजी अनेक चौकटी करीत भिंती उभा राहिल्याचे दिसून येत आहे. पूर्वी दगडाच्या कामाला मागणी असायची. घडीव दगडाचे काम केल्याने पैसा मिळायचा. तेव्हा खर्च कमी आणि समाधान मिळायचे, पण आता दगडी कामे कोणीच करीत नसल्याने दगडी बांधकाम आम्हा मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे जुने घडीव दगडी बांधकाम करणारे कडा येथील मजूर मारुती जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
180921\18bed_1_18092021_14.jpg