माजलगाव : राजकारणामुळे गावागावात होणारे भांडण होऊ नये म्हणून तालुक्यातील चोपणवाडी येथील गावकऱ्यांनी एक बैठक घेऊन सात जागांसाठी केवळ सातच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली.
माजलगाव तालुक्यातील चोपणवाडी हे गाव अत्यंत लहान.
केवळ १०० ते ११० उमरे असलेले हे गाव असून या गावची लोकसंख्याही एक हजाराच्या जवळपास आहे, तर ४७५ मतदार आहेत. या गावात सर्व समाजाचे लोक राहत असून जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. यामुळे यांची शेतीवरच उपजीविका चालते.
चोपणवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक मागील महिन्यात लागल्यानंतर या गावातील सर्व पक्षांच्या लोकांनी एकत्र बसून गावचा एकोपा टिकविण्यासाठी, भावकी भावकीत भांडण होऊ नये म्हणून व गावच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले. त्यानंतर गावातील सर्व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली व त्यात निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांची नावे घेऊन त्यातील कामे करणाऱ्या लोकांना सर्वानुमते उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ सातच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला नाही व कोणी कोणावर आक्षेपही घेतला नाही. यामुळे या गावची निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्यात जमा असून त्याच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये
गणेश वनवे, मोहन वनवे, बलभीम वनवे, शोभा भीमराव काटे, सोनाली विलास बडे, रत्नमाला अंगद ढाणे व शेख रेश्मा राजू यांचा समावेश आहे.
आम्ही पक्ष, संघटना बाजूला ठेवत
गावच्या विकासासाठी व गावातील सर्वांमध्ये एकोपा राहावा म्हणून गावपातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला व सात जागांसाठी केवळ सातच लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याव्यतिरिक्त कोणीच उमेदवारी दाखल केली नाही.
-रमेश वनवे, ग्रामस्थ, चोपणवाडी