बीड : शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेटचोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.शहरातील जालना रोडवर गणेश हौसिंग सोसायटी परिसरात सिगारेटचे ठोक व्यापारी महावीर बेदमुथ्था यांच्या घरालगत असलेले गोदाम ११ जुलै रोजी पहाटे फोडून चोरट्यांनी ६ लाख ९० हजार रुपयांचा माल चोरुन नेला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ४६१, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल झाला होता. शहरातील या मोठ्या गुन्ह्याची गंभीरपणे दखल घेत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार विशेष पथके नेमली होती. दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि गजानन जाधव व त्यांच्या पथकाने या चोरीचा तपास सुरु केला. गुप्त माहितीच्याआधारे पथकाने बिलाल अब्दुल रज्जाक (रा. बुंदेलपुरा, व्यवसाय पानटपरी) याला ताब्यात घेतले.अधिक चौकशीनंतर त्याच्या गेवराई येथील घरातून पोलिसांनी ११ जुलै रोजीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला सिगारेटचा सर्व माल त्याशिवाय जास्तीच्या सिगारेटचा असा १० लाखांचा माल जप्त केला. पोलिसांनी बिलालकडून एक मालवाहू वाहनही (एम. एच. २४ जे ८७७६) ताब्यात घेतले आहे. यात आणखी कोणी सहभागी आहेत का याचा तपास सुरु आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, डीवायएसपी विजय कबाडे, भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन जाधव, पो. ह. मुंजाबा सौंदरमल, राजेभाऊ नागरगोजे, पोना. राहुल धांडे, भारत बंड, मनोज वाघ, अशोक दुबाले, दिलीप गित्ते, महेश भागवत, नारायण साबळे, श्रीमंत उबाळे, सुबराव जोगदंड, अंकुश दुधाळ यांनी कारवाई केली.
४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:31 AM
शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देबुंदेलपुऱ्यातील पानटपरी चालकाला अटक । चोरीस गेला सात लाखांचा, जप्त केला दहा लाखांचा माल; इतर आरोपींचा शोध सुरु