नेकनूर : परिसरातील सॉ मिलवर मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या तोडून आणलेली झाडांची लाकडे दिसून येतात. यामुळे वनविभागाने सॉ मिलचालकावर अवैधरीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
पांदण रस्ता नसल्याने शेतकरी झाले त्रस्त
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत बैलगाडीदेखील शेतात जात नसल्याने मालाची वाहतूक व शेतातील कामे करणे जिकिरीचे बनत आहे. त्यामुळे रस्ता तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
नदीपात्रातून वाळूउपसा थांबवावा
नांदूरघाट : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूउपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाळूउपसा थांबवण्याची मागणी होत आहे.
हातरूमाल, उपरणे विक्री वाढली
पाटोदा : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारात हातरूमाल, उपरणे, टोपी यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, उन्हामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी नागरिकांमधून उपाययोजना केल्या जात आहेत.
शेतकऱ्यांनी फरदड कापूस पीक घेऊ नये
बीड : जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून, अनेक जण बहरातील वेचणी झाल्यानंतरही फरदड कापूस पीक घेतात. यामुळे बोंडअळी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेवटी राहिलेल्या फरदड कापसाची बोंडे न वेचता काढणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चौसाळा ते जेबापिंप्री रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा ते जेबापिंप्री या नऊ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने चारचाकी तर सोडाच दुचाकीधारकालादेखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.