लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव शहर व ११ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली ६-७ महिन्यांपासून बंद असल्याने या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. मागील १५ दिवसांपासून चक्क हिरव्यागार रंगाचे पाणी पिण्याची वेळ आल्याने माजलगाव शहर ग्रामीण भागात मागील अनेक महिन्यांपासून साथरोगाने थैमान घातले असताना येथील नगरपालिका प्रशासनाला काहीच घेणे देणे राहिलेले नसल्याने ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.माजलगाव शहर व आजुबाजूच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणा-या जलशुद्धीकरण केंद्रवरील दुरुस्ती करण्यासाठी ६-७ महिन्यांपासून हे जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. यामुळे या गावांना सहा महिन्यांपासून थेट धरणातून येणारे पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. माजलगाव धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने पाण्यासोबत मोठयाप्रमाणावर गाळ येत असल्यामुळे व जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने पाणी शुध्द न करताच नळाद्वारे सोडण्यात येत आहे. यामुळे मागील सहा महिन्यांपासून या गावांना नळाद्वारे अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. आता तर धरणाची पाणी पातळी मोठयाप्रमाणावर खालावल्याने धरणातील पाणी हिरवे पडू लागले आहे.हे पाणी जलशुद्धीकरण बंद असल्याने व पाणी शुद्ध न करताच या गावांना नळाद्वारे सोडल्याने येथील नागरिकांना हिरवेगार शेवाळेयुक्तपाणी पिण्याची वेळ आली आहे. हे दूषित पाणी ६-७ महिन्यांपासून दिले जात असल्याने या पाण्यात घाण येत असून, अनेकवेळा अळ्या देखील पाण्यात निघत आहेत तर या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिक या पाण्याचा केवळ सांडपाण्यासाठीच उपयोग करताना दिसत असून, पिण्यासाठी विकतचे पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.दुसरीकडे हे पाणी पिल्याने माजलगाव शहर व आजुबाजूच्या गावांना साथरोगाने थैमान घातले असून, या गावांमध्ये सध्या ताप व जुलाब आदी प्रकारचे साथ रोग फोफावल्याने येथील ग्रामीण व खाजगी रु ग्णालयात या रु ग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. साथ रोगाचे थैमान चालू असताना देखील नगरपालिका प्रशासनाला जाग येत नसून दुरुस्तीच्या नावावर सहा महिन्यांपासून जलशुद्धीकरण बंद ठेवली आहे.माजलगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी हरिकल्याण एल्गट्टे हे २-३ महिन्यांपासून रजेवर असल्याने त्यांचा चार्ज हा येथील तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्याकडे दिला होता. परंतु नगरपालिका कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याने व विधानसभा निवडणुकीची कामे चालू असल्याने प्रतिभा गोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे चार्ज संभाळू शकत नसल्याबाबत कळवले असल्याची माहिती मिळते. सध्या कोणाकडेच मुख्याधिकाºयांचा पदभार नसल्याने नगरपालिका वा-यावर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे थांबली आहेत. त्यामुळे नागरिकांना परेशानीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्या कारणाने नागरिकांना प्यावे लागतेय हिरवेगार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:25 AM