- मधुकर सिरसटकेज : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा जलाशयात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार जिवंत पाणीसाठा ७६.५० टक्के एवढा झाला आहे. त्यामुळे हे धरण कधीही भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही माहिती लातूर येथील पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी बीड ,लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर येथील जिल्हाधिकाऱ्यांना कळविली आहे. मांजरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या नोंदीनुसार मांजरा धरणाचीपाणी पातळी ६४१.३५ मीटर असून, धरणातील उपयुक्त जिवंत पाणीसाठा ७६.५० टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून पाण्याचा येवा असाच राहिला तर मांजरा धरण कधीही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा मांजरा जलाशयाचे दरवाजे उघडण्यात येऊन नदीपात्रात सोडावा लागणार आहे. त्यामुळे मांजरा धरणाखालील मांजरा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी होणार नाही, यासाठी मांजरा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा आपल्या स्तरावरून द्यावा, असे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
ईमेलद्वारे आदेश निर्गमित...बीड, लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर येथील जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश ईमेलद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार नसल्याची माहिती मांजरा जलाशयाच्या पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक एकचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.