पाटोदा : शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगरपंचायतकडून नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. काही लोक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पाटोदा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा नसता महिलांचा नगरपंचायतवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष निला पोकळे यांनी दिला आहे.
पाटोदा शहराच्या क्रांतीनगर ,जयसिंग नगर तसेच शिवाजी नगर, माउली नगर आदी भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नगरपंचायतकडून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर भटकंती करावी लागत आहे. पाटोदा शहरातील अनेक विंधन विहिरी व तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते दोनशे- तीनशे रुपये देऊन आपली पाण्याची तहान भागवत आहेत. नगरपंचायतला अनेक वेळा लोकांनी पाणी संदर्भात विनवण्या केल्या मात्र दखल न घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसात जर पाणी सोडले नाही तर शहरातील महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.