बीड : बांधकाम परवाना देण्यासाठी खासगी अभियंत्यामार्फत ४० हजार रूपयांची लाच मागितली. यातील ३० हजार रूपये घेताना अभियंत्याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर नगररचनाकारालाही ताब्यात घेतले. ही कारवाई नगररचनाकार कार्यालयात बुधवारी सायंकाळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली.
अंकुश लिमगे हे बीड नगर पालिकेत नगररचना सहायक या पदावर आहेत. त्यांच्याकडे शिरूर नगर पंचायत आणि जिल्हा नगररचनाकार या पदाचा अतिरिक्त पदभार होता. शिरूरमधील एका व्यक्तीचा बांधकाम परवाना देताना त्रूटी काढल्या. यात पुन्हा त्रूटी न काढण्यासाठी लिमगे याने खासगी अभियंता ईझारोद्दीन शेख मैनोद्दीन (वय २८ रा.शिरूरकासार) या मार्फत ४० हजार रूपयांची लाच मागितली. याची तक्रार करताच बुधवारी एसीबीने पालिका परिसरात सापळा लावला.
आपल्या कार्यालय परिसरात शेख याने लाच स्विकारली. त्यानंतर लिमगे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, पाेलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, श्रीराम गिराब, भरत गारदे अविनाश गवळी आदींनी केली.