बीड: साधारण नऊ महिन्यापूर्वी पीडितेच्या मोठ्या बहिणीचे लग्न होते. त्यामुळे सर्वच कामात व्यस्त होते. याच संधीचा गैरफायदा घेत चुलत्यानेच अवघ्या १४ वर्षाच्या आपल्या पुतणीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडिता आपल्या आई-वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी कोल्हापुरला गेली. दोन दिवसांपूर्वी कारखाना संपल्याने परत बीडला येत असतानाच कळंबजवळ कळा सुरू झाल्या. रूग्णालयात दाखल केल्यावर तिची प्रसुती झाली. याप्रकरणी चुलत्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पीडिता ही आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले.
बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे जुलै २०२३ मध्ये लग्न होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य लग्नाच्या कामात व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत चुलत्याने पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली होती. तिला धमकी देत चुलत्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने कोणालाच सांगितला नाही. नंतर पीडिता ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडणीसाठी कोल्हापुर जिल्ह्यात गेली. सहा महिने ऊस तोडण्यात मदतही केली. दोन दिवसांपूर्वी काम संपल्याने हे सर्व लोक गावी परत येत होते.
कळंबजवळ येताच पीडितेला कळा सुरू झाल्या. तीला तातडीने कळंबच्या एका रूग्णालयात दाखल केले. तेथे सोनोग्राफी करून लगेच तिची प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीलाही जन्म दिला. त्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटली. रूग्णालयाने पोलिसांना कळविल्यावर कळंब पोलिस ठाण्यात चुलत्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तो आता झिरोने पिंपळनेर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत.