सखाराम शिंदे
गेवराई : येथील तहसील कार्यालयात अभिलेखा, पुरवठा, रस्ते, गौण खनिज, श्रावणबाळ योजनांसह सर्व विभागाची कागदपत्रे लवकर सापडण्यासाठी अभिलेख्यांचे विभागनिहाय वर्गीकरण करण्यात येत आहे. तसेच चालू संचिका ई टपाल पोर्टलवर नमूद करणे, स्वच्छतेच्या कामांमुळे कार्यालय स्वच्छ दिसणार असून, नागरिकांची कामे जलद गतीने होतील, असे मानले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील तहसील कार्यालयात सर्व विभागांची कागदपत्रे व्यवस्थित लावण्याचे काम सुरू आहे. येथील तहसील कार्यालयातील फेरफार नक्कल, सातबारा, गौण खनिज पुरवठा,संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, लेखा, आस्थापनासह विविध विभागांचे गेल्या १९८० पासून काहींचे गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत; तर काही कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे अनेक वेळा पाठपुरावा करूनही लवकर होत नव्हती. तसेच अनेक कागदपत्रे फाटलेल्या अवस्थेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबतात. त्यामुळे तहसील कार्यालयातील सर्व विभागांची कागदपत्रे व्यवस्थित लावणे व अभिलेखा विभागात वर्ग करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी महसूलमधील तलाठी, कोतवाल, शिपाई, सर्व कर्मचारी कागदपत्रे व्यवस्थित ठेवून त्यांचे गठ्ठे लावण्याचे काम करीत आहेत. या मोहिमेमुळे कागदपत्रे, दस्तऐवज व्यवस्थित राहतील व नागरिकांनी मागणी केल्यास त्यांना वेळेवर मिळतील. या कामांमुळे कार्यालय स्वच्छ दिसू लागले आहे.
निकाली संचिकांचा ढिगारा
येथील तहसील कार्यालयातील सर्व विभागांच्या निकाली संचिका १९८० पासून अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. त्या व्यवस्थित लावण्याचे काम येथील तहसील कार्यालयात सुरू असून त्यामुळे नागरिकांना वेळेवर कागदपत्रे तसेच कार्यालय स्वच्छ राहील, असे तहसीलदार सचिन खाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.