बीड : बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. बुधवारी याचा निकाल राष्ट्रपतींकडून जाहीर करण्यात आला आहे. या मोहीमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाने पाच २०१४ साली स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली. सुरूवातीला या मोहीमेत देशातील केवळ ४४० शहरांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर यात जनजागृती वाढविण्यासह जास्त शहरांना सहभागी करून घेण्यात आले. बीड पालिकेनेही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून २०१७ च्या मोहीमेत ३०२ वा तर २०१८ च्या मोहीमत ११० व्या क्रमांकावर झेप घेतली. ही यशाची परंपरा पालिकेने कायम ठेवली. यावर्षी म्हणजेच २०१९ च्या मोहीमेत देशातील तब्बल ४ हजार ५०० शहरांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. एवढ्या सर्व शहरांना पाठिमागे टाकत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवून ९४ वा क्रमांक पटकावला. तर राज्यात २७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. परिश्रमाला नियोजनाची जोड दिल्याने बीड पालिकेला हे यश संपादन करण्यात आलेले आहे.
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, प्रभारी मुख्याधिकारी मिलींद सावंत, उपअभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, महादेव गायकवाड, ज्योती ढाका, भारत चांदणे, शहर समन्वयक विश्वजीत राऊत, कर्मचारी रमेश डहाळे, रमा शिनगारे, स्वाती कागदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मुकादम, कामगार यांनी यासाठी परिश्रम घेतले.