बीड : अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर तहसीलमध्ये लावले. ते सोडण्यासाठी गेवराई तहसीलमधील अव्वल कारकुनने १ लाख रूपयांची लाच मागितली. पैकी ७० हजार रूपयांत तडजोड झाली. मात्र संशय आल्याने त्याने पैसे स्विकारले नाहीत. मात्र पुराव्यावरून या कारकुनाविरोधात गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.
सुबोध जैन असे या कारकुनाचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा करणारा एक हायवा टिप्पर महसूल विभागाने पकडला होता. त्यानंतर हा हायवा सोडण्यासाठी अव्वल कारकून सुबोध जैन (रा.जैन मंदिर गल्ली, मेन रोड, गेवराई) यांनी १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ७० हजार रुपयांवर मिटले होते. त्यानंतर संबंधिताने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे एसीबीने पडताळणी केल्यानंतर जैन यांनी लाच मागितल्याचे दिसून आले. त्यानुसार २७ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात सापळाही लावला होता. मात्र सुबोध जैन यांना तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यादिवशी लाच स्विकारली नाही. त्यानंतर त्यांना संशय आल्याने जैनने लाच स्विकारण्यास मनाई केली. मात्र आगोदर लाचेची मागणी केल्याचे पुरावे असल्याने जैन विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे व त्यांच्या टिमने केली.