मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो. अन्यथा ते मास्क चढ्या भावाने विकले जातात. दोन पदरी आणि तीन पदरी मास्क दुप्पट भावाने विकले जात असल्याचे दिसून येत आहे.
भुरट्या चोऱ्यांत वाढ
सिरसाळा : शहरात गेल्या आठवड्यापासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गस्त वाढविण्याची मागणी होत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थींच्या खात्यावर टाकण्यात आले नाहीत. याबाबत मागणी करूनही आश्वासनाशिवाय काहीही मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
नागरिकांची कसरत
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील पाणंद रस्ते परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. ते दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात येण्या- जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नद्यातून वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे.