बीड : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बंद केलेले सहा कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यासह तीन खासगी रूग्णालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यात खासगी व शासकीय अशा १७ आरोग्य संस्था बाधितांवर उपचार करणार आहेत.
जिल्ह्यात गतवर्षी ८ एप्रिलला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. वाढती रूग्णसंख्या पाहून लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. तसेच काही खासगी रूग्णालयांनाही बाधितांवर उपचार करण्याची परवानगी दिली होती. जिल्ह्यात जवळपास ३५ आरोग्य संस्थांमध्ये बाधितांवर उपचार केले जात होते. परंतु नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात रूग्णसंख्या कमी झाल्याने तालुकास्तरावरील सर्व कोविड केअर सेंटर बंद केले होते. तसेच ५० टक्के कर्मचारीही कपात केले होते. परंतु आता पुन्हा रूग्णसंख्या वाढू लागल्याने बंद केलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. यात बीडमधील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक विद्यालय बीड, शिरूरकासार, गेवराई, माजलगाव, केज, परळी येथील समाजकल्याणच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यासह बीड, माजलगाव व परळी येथे खासगी रूग्णालयांना उपचारासाठी परवानगी दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी रविवारी माध्यमांना एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
अशी आहे आकडेवारी
एकूण शासकीय आरोग्य संस्था ११
खासगी आरोग्य संस्था ६
खाटांची क्षमता १९२१
मंजूर खाटा १२०३
एवढ्या खाटांवर रूग्ण ८५३
रिकाम्या खाटा ३५०
-----
जिल्ह्यातील एकूण रूग्ण २०४२७
एकूण कोरोनामुक्त १८९४८
एकूण मृत्यू ५९०