आष्टी : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत. नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मच्छिंद्रगड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने वस्तीवरील रस्ते वाहून गेली आहेत. तेथील नागरीकांचा संपर्क तुटला आहे. तर उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे.
सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागिल तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या सामना करावा लागलेल्या शेतक-यांना यावर्षी तरी चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. शेतक-यांनी खरीपातील पेरणी उसनवारी करुन बी बियाणे खरेदी केली होती. मात्र, काढणीला आलेले उडीद पिक शेतक-याला पावसाने काढता आले नाही. तर काढणी करुन ठेवलेले उडीद रात्री अचानक जोरदार पाऊस आल्याने भिजले. समाधानकारक पाऊस झाल्याने पिकेही चांगली आली. पावसाअभावी उत्पन्न घटले आता थोडेफार आलेले उत्पन्न ऐन तोंडात भरवायला आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर
आष्टी शहरासह तालुक्यातील गावांमध्ये पावसाने शेतकर्यांचे मका,ऊस,उडिद, बाजरी, कापूस,तुर अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे.पिके पाण्यात आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी केलेली बाजरी पाण्यात भिजत आहे.तर काही शेतकऱ्यांच्या उडिद,बाजरी पिकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.काही शेतक-यांचा उडिद बाजारात गेला असून काही शेतकऱ्यांचा पाण्यात भिजत आहे.तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली पिके पाण्यात भिजत आहेत.या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आर्थिक मदत करावी आमच्या सावरगाव व मच्छिंद्रनाथ गड परिसरात असा आता पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे उडीद, कापूस,सायबिन,कांडे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकर्यांना आर्थिक मदत करावी - सोमनाथ क्षीरसागर शेतकरी सावरगाव
पिकांचे डोळ्यांदेखत नुकसानपावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपुर्ण उडीद पाण्यात आहे. अगोदर संतधार पाऊस ३ ते ४ दिवसांपासून पडत असल्याने उभे उडीद पिक कोमेजले. रात्रीपासून अचानक जोरदार पाऊस कोसळल्याने काढलेल्या ३ एकर शेतातील उडीद पूर्णपणे भिजले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- भगवानराव सांगळे ( शेतकरी,क-हेवडगांव )